बिबट्याच्या हल्ल्यात ४ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू; गोंदे शिवारात हृदयद्रावक घटना

0
66

सिन्नर: तालुक्यातील गोंदे शिवारात शुक्रवारी (दि. २०) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शेतात काम करून घरी परतणाऱ्या एका महिलेसमोर तिच्या चार वर्षांच्या मुलीला बिबट्याने झाडाझुडपातून बाहेर येत हल्ला करून ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली. जान्हवी सुरेश मेंगाळ (वय ४) असे या बालिकेचे नाव आहे.जान्हवी तिच्या आईसोबत शेतातून परतत असताना अचानकपणे दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर झडप घातली. बिबट्याने जान्हवीला ओढत शेजारील ज्वारीच्या पिकात नेण्याचा प्रयत्न केला. ही घटना घडताच आईने आणि सोबत असलेल्या मजुरांनी मोठ्या आवाजात आरडाओरड सुरू केली. आवाज ऐकून बिबट्याने घाबरून जान्हवीला सोडले आणि तो तिथून जंगलात पसार झाला.मात्र बिबट्याच्या तावडीत सापडल्याने जान्हवीच्या मानेवर गंभीर जखमा झाल्या होत्या. घटनास्थळी उपस्थित मजुरांनी तात्काळ जवळील शेतकऱ्यांना  शरद तांबे आणि प्रकाश तांबे यांना माहिती दिली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जान्हवीला दुचाकीवरून सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.या घटनेची माहिती मिळताच वनविभाग व वावी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. शिवारात काही महिन्यांपूर्वीही अशीच एक घटना घडली होती, जेव्हा एका आठ वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याचा जीव घेतला होता.पुन्हा एकदा अशा प्रकारची घटना घडल्याने संपूर्ण गोंदे शिवार आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये प्रचंड असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून वनविभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.